Skip to content

Indian Revised Version — Marathi (2019)

स्तोत्रसंहिता 44

1मुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे मसकील (शिक्षण) हे देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी ते आम्हास सांगितले आहे, की पुरातन दिवसात तू, त्यांच्या दिवसात काय कार्य केलेस. 2तू तुझ्या हाताने राष्ट्रांना घालवून दिलेस, परंतु आपल्या लोकांस स्थापिले, तू लोकांस पीडले परंतु आपल्या लोकांस तू वाढवले. 3कारण त्यांनी आपल्या तलवारीने देश मिळवला नाही. आणि त्यांच्या बाहूंनी त्यांना तारले नाही. परंतू तुझा उजवा हात, तुझा भुज, तुझ्या मुखाच्या प्रकाशाने त्यांना तारले, कारण तू त्यांच्यावर अनुकूल होतास. 4देवा, तू माझा राजा आहेस, याकोबाला विजय मिळावा म्हणून आज्ञा दे. 5तुझ्या मदतीने आम्ही शत्रूला मागे ढकलू. जे आमच्याविरूद्ध उठतात, तुझ्या नावाने आम्ही आमच्या शत्रूंना तुडवून टाकू. 6कारण माझ्या धनुष्यबाणांवर माझा विश्वास नाही. किंवा माझी तलवार मला वाचवू शकेल. 7परंतु तू आम्हांला आमच्या शत्रूंपासून वाचवले आहेस. आणि जे आमचा द्वेष करतात त्यांना लाजवले आहेस. 8देवाच्या ठायी रोज आम्ही आमचा अभिमान बाळगला आहे, आणि तुझ्या नावाला आम्ही सर्वकाळ महिमा देऊ. (सेला) 9परंतु आता तू आम्हास फेकून दिले आहे, आणि आमची अप्रतिष्ठा होऊ दिली आहे. आणि तू आमच्या सैन्यासोबत पुढे जात नाहीस. 10तू आमच्या शत्रूंपुढे आम्हास मागे हटण्यास लावले, आणि आमचा द्वेष करणारे त्यांच्यासाठी लूट घेतात. 11तू आम्हास भक्ष्याकरता योजलेल्या मेंढ्यासारखे केले आहे, आणि आम्हास देशात विखरून टाकले आहेस. 12तू तुझ्या लोकांस कवडीमोलाने विकलेस, आणि असे करून तू आपली संपत्ती देखील वाढवली नाही. 13तू शेजाऱ्यांमध्ये आम्हांस निंदा आणि आमच्या सभोवती असणाऱ्यांमध्ये आम्हांस हसण्याजोगे आणि थट्टा असे केले आहे. 14राष्ट्रांमध्ये तू आम्हास अपमान असे केले आहे, लोक आम्हास बघून आपले डोके हलवतात. 15सर्व दिवस माझी अप्रतिष्ठा माझ्या समोर असते. आणि माझ्या मुखावरच्या लज्जेने मला झाकले आहे. 16कारण माझ्या निंदकाच्या आणि अपमानाच्या शब्दाने, शत्रू आणि सुड घेणाऱ्यांमुळे माझे मुख लज्जेने झाकले आहे. 17हे सर्व आमच्यावर आले आहे, तरी आम्ही तुला विसरलो नाही, किंवा करारांत खोटे वागलो नाही. 18आमचे हृदय मागे फिरले नाही, आमची पावले तुझ्यापासून दूर गेली नाहीस. 19तरी तू आम्हास कोल्हे राहतात त्या जागेत चिरडलेस, आणि मृत्यूछायेने आम्हास झाकले आहेस. 20जर आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो असेल किंवा आमचे हात अनोळखी देवाकडे पसरवले असतील, 21तर देव हे शोधून काढणार नाही काय? कारण तो हृदयातील गुप्त गोष्टी जाणतो. 22खरोखर, आम्ही दिवसभर तुझ्यासाठी मारले जात आहोत. मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे आम्ही आहोत. 23प्रभू, ऊठ तू का झोपला आहेस? ऊठ, आम्हास कायमचा सोडून जाऊ नकोस. 24तू आमच्यापासून आपले मुख का लपवतोस? आणि आमचे दु:ख आणि आमच्यावरचे जुलूम तू का विसरतोस? 25कारण आमचा जीव धुळीस खालपर्यंत गेला आहे, आणि आमचे पोट भूमीला चिकटले आहे. 26आमच्या साहाय्याला ऊठ! आणि तुझ्या प्रेमदयेस्तव आम्हास वाचव.

Keep going

Indian Revised Version — Marathi (2019). Indian Revised Version (Marathi), Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0, via eBible.org. Inline cross-reference notes removed..

Books

✦ Explain this verse with AI AI explanations, Bible Q&A, characters, maps and more — in the Truth of Bible app →

Reading settings

Theme
Text size
100%
Layout

Loading the Bibles…

Your choice is remembered on this device and used for reading, search and the verse screen.