Indian Revised Version — Marathi (2019)
लूक 9
1मग त्याने त्या बारा शिष्यांस एकत्र बोलावून त्यांना सर्व भूतांवर आणि रोग बरे करायला, सामर्थ्य व अधिकार दिला, 2आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याविषयीचा संदेश जाहीर करायला व रोग्यांना बरे करायला पाठवले. 3तो त्यांना म्हणाला, “वाटेसाठी काही घेऊ नका; काठी किंवा झोळी किंवा भाकर किंवा पैसा घेऊ नका आणि दोन दोन अंगरखेही घेवू नका. 4आणि ज्या कोणत्याही घरात तुम्ही जाल, तेथेच राहा व तेथूनच निघून जा. 5जितके तुम्हास अंगीकारीत नाहीत तितक्यांच्याविरुद्ध साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या नगरातून निघते वेळी आपल्या पायांची धूळ झाडून टाका.” 6तेव्हा ते निघाले आणि सर्व ठिकाणी सुवार्ता सांगत व रोग बरे करीत गांवोगांवी फिरत गेले. 7घडत असलेल्या सर्व गोष्टी ऐकून हेरोद राजा फार घोटाळ्यात पडला, कारण “योहान मरण पावलेल्यांमधून उठला आहे.” असे कित्येक म्हणत होते; 8आणि कित्येक म्हणत होते की “एलीया प्रकट झाला आहे” आणि दुसरे म्हणत होते की “पुरातन संदेष्ट्यातील कोणीएक उठला आहे.” 9तेव्हा हेरोद म्हणाला, “योहानाचे शीर मी तोडले, पण ज्याच्याविषयी अशा गोष्टी मी ऐकतो तो हा कोण आहे?” आणि तो त्यास भेटायला पाहत होता. 10मग प्रेषितांनी परत येऊन आपण जे काही केले होते ते त्यास सविस्तर सांगितले. मग तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या नगराकडे एकीकडे गेला. 11परंतु याविषयी लोकांनी ऐकल्यावर ते त्याच्यामागे गेले. तेव्हा तो त्यांचे स्वागत करून त्यांच्याशी देवाच्या राज्याविषयी बोलू लागला आणि ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना त्याने बरे केले. 12दिवस संपत आला, तेव्हा बारा जण जवळ येऊन त्यास म्हणाले, “समुदायाला निरोप दे, म्हणजे ते आसपासच्या गावांत व खेड्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहो.” 13पण तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन या लोकांसाठी अन्न विकत आणले नाही, तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आम्हाजवळ काही नाही.” 14कारण ते सुमारे पाच हजार पुरूष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “पन्नास पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यास बसवा,” 15मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे करून सर्वांस बसवले. 16त्याने त्या पांच भाकरी व ते दोन मासे घेतले आणि वर स्वर्गाकडे पाहून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले. 17तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले; आणि त्यांनी मोडलेल्या तुकड्यांतले उरले ते बारा टोपल्या भरून त्यांनी उचलून घेतले. 18आणि असे झाले की तो एकांतात प्रार्थना करत असता शिष्य त्याच्याबरोबर होते, तेव्हा त्याने त्यांना विचारून म्हटले, “लोकसमुदाय मला कोण म्हणून म्हणतात?” 19मग त्यांनी उत्तर देऊन म्हटले, “बाप्तिस्मा करणारा योहान, पण कित्येक म्हणतात ‘एलीया,’ व कित्येक म्हणतात की, पुरातन संदेष्ट्यातील कोणीएक पुन्हा उठला आहे.” 20त्याने त्यांना म्हटले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” तेव्हा पेत्राने उत्तर देऊन म्हटले, “देवाचा ख्रिस्त.” 21पण हे कोणाला सांगू नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली. 22आणि म्हटले, “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावी आणि वडील व मुख्य याजक लोक व नियमशास्त्र शिक्षक यांच्याकडून नाकारले जावे व जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे, याचे अगत्य आहे.” 23आणि तो सर्वांना म्हणाला, “जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे व दररोज आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे चालावे. 24कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास वाचवील. 25कारण मनुष्याने सगळे जग मिळवून स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ होईल? 26जो कोणी माझ्याविषयीची व माझ्या वचनाविषयी लाज धरील त्यांच्याविषयीची लाज मनुष्याचा पुत्र जेव्हा आपल्या स्वतःच्या, पित्याच्या व पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील. 27आणि मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे राहणाऱ्यांतले काही असे आहेत की, ते देवाचे राज्य पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.” 28आणि या गोष्टी सांगितल्यानंतर सुमारे आठ दिवसानी असे झाले की, पेत्र व योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला. 29तेव्हा तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूप पालटले व त्याचे वस्त्र पांढरे शुभ्र लखलखीत झाले. 30आणि पाहा, दोन पुरूष त्याच्याशी संभाषण करीत होते; हे मोशे व एलीया होते, 31ते तेजस्वी दिसत होते आणि जे त्याचे प्रयाण तो यरूशलेम शहरात पूर्ण करणार होता, त्याविषयी ते बोलत होते. 32तेव्हा पेत्र व त्याच्याबरोबर जे होते ते झोपेने भारावले होते, परंतु ते पूर्णपणे जागे झाले तेव्हा त्यांचे तेज आणि जे दोन पुरूष त्याच्याजवळ उभे राहिले होते त्यांनाही पहिले. 33मग असे झाले की ते त्याच्यापासून दूर होत असता पेत्राने येशूला म्हटले, “हे गुरु, येथे असणे आम्हास बरे आहे; तर आम्ही तीन मंडप करू, तुझ्यासाठी एक व मोशेसाठी एक व एलीयासाठी एक.” आपण काय बोलत आहोत याचे त्यास भान नव्हते. 34तो या गोष्टी बोलत असता एक ढग येऊन त्यांच्यावर सावली करू लागला आणि ते ढगांत शिरले तेव्हा ते भ्याले. 35आणि ढगांतून वाणी आली, ती म्हणाली, “हा माझा निवडलेला पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका.” 36ही वाणी झाल्यावर येशू एकटाच दिसला आणि ते उगेच राहिले व ज्या गोष्टी त्यांनी पहिल्या होत्या त्यांतले काहीच त्यांनी त्या दिवसांमध्ये कोणाला सांगितले नाही. 37आणि असे झाले की दुसऱ्या दिवशी ते डोंगरावरून खाली आल्यावर मोठा लोकसमुदाय त्यास भेटला. 38तेव्हा पाहा, समुदायातील एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, हे गुरु, मी तुला विनंती करतो, माझ्या मुलाकडे पाहा, कारण तो माझे एकुलते मूल आहे. 39आणि पाहा, कोणी आत्मा त्यास धरतो आणि हा एकाएकी ओरडतो, मग तो याला असा पिळतो की त्याच्या तोंडाला फेस येतो, तो याला पुष्कळ त्रास देतो व याला मोठ्या प्रयासाने सोडून जातो. 40आणि तो काढावा म्हणून मी तुझ्या शिष्यांना विनंती केली, परंतु त्यांच्याने तो निघेना. 41तेव्हा येशूने उत्तर देऊन म्हटले, “हे अविश्वासी व विपरीत पिढी, मी कोठेपर्यंत तुमच्याबरोबर राहू व तुमचे सोसू? तू आपल्या मुलाला इकडे आण.” 42मग तो जवळ येत आहे इतक्यात भूताने त्यास खाली आपटले व भारी पिळून टाकले, पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले व मुलाला बरे करून त्याच्या पित्याजवळ परत दिले. 43मग देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले आणि तो जी कामे करीत होता त्या सर्वांवरून सर्वजण आश्चर्य करीत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला, 44“या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा कारण मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या हाती दिला जाणार आहे.” 45परंतु हे बोलणे त्यांना समजले नाही व त्यांना ते समजू नये म्हणून ते त्यांच्यापासून गुप्त राखलेले होते; आणि ते या बोलण्याविषयी त्यास विचारायला भीत होते. 46त्यानंतर आपणांमध्ये कोण मोठा आहे याविषयी त्यांच्यामध्ये वादविवाद उठला. 47तेव्हा येशूने त्यांच्या अंतःकरणाचे विचार जाणून एका बालकाला जवळ घेऊन त्यास आपल्यापाशी उभे केले, 48आणि त्यांना म्हटले, “जो कोणी माझ्या नावाने या बालकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो; कारण तुम्हा सर्वांमध्ये जो सर्वांहून लहान आहे तोच मोठा आहे.” 49तेव्हा योहानाने उत्तर देऊन म्हटले, “हे गुरु, आम्ही कोण एकाला तुझ्या नावाने भूते काढतांना पाहिले आणि आम्ही त्यास मना केले, कारण तो आमच्याबरोबर तुझ्यामागे चालत नाही.” 50तेव्हा येशूने त्यास म्हटले, “मना करू नका, कारण जो तुम्हास प्रतिकूल नाही तो तुम्हास अनुकूल आहे.” 51आणि असे झाले की त्यास वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा यरूशलेम शहरास जाण्याच्या दृढनिश्चयाने त्याने आपले तोंड वळवले. 52मग त्याने आपल्यापुढे निरोपे पाठवले, तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यास शोमरोन्यांच्या एका गावात गेले, 53पण त्यांनी त्यास अंगीकारले नाही, कारण यरूशलेम शहराकडे जाण्याचा त्याचा रोख होता. 54तेव्हा त्याचे शिष्य याकोब व योहान हे पाहून म्हणाले, “हे प्रभू, एलीयाने केले होते तसेच आकाशांतून अग्नीने पडून त्याचा नाश करावा म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी तुझी इच्छा आहे काय?” 55परंतु त्याने वळून त्यांना धमकावले आणि म्हटले, “तुम्ही कोणत्या आत्म्याचे आहात हे तुम्हास ठाऊक नाही; 56कारण मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या जीवाचा नाश करायला नाही, तर त्यांना तारायला आला आहे.” मग ते दुसऱ्या गावाला गेले. 57आणि ते वाटेने चालत असता कोणीएक त्यास म्हणाला, “जेथे कोठे तू जाशील तेथे मी तुझ्यामागे येईन.” 58तेव्हा येशू त्यास म्हणाला, “खोकडांस बिळे व आकाशांतल्या पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकायला ठिकाण नाही.” 59मग त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, “माझ्यामागे ये,” परंतु तो म्हणाला, “हे प्रभू, पहिल्याने मला जाऊ दे आणि माझ्या पित्याला पुरू दे,” 60तेव्हा येशूने त्यास म्हटले, “मरण पावलेल्यांना आपल्या मरण पावलेल्यांस पुरू दे, परंतु तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.” 61तेव्हा आणखी एकजण म्हणाला, हे प्रभू, मी तुझ्यामागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरात जे आहे त्यांचा निरोप घेऊ दे. 62पण येशूने त्यास म्हटले, “जो कोणी नांगराला आपला हात घातल्यावर मागील गोष्टींकडे पाहत राहतो असा कोणीही देवाच्या राज्याला उपयोगी नाही.”
This chapter is not in this version.
Keep going
In the life of Jesus 11 events in this chapter
- v1–6 93. Jesus sends out the twelve disciples Also in Mt 10:1-16 · Mk 6:7-13
- v7–9 95. Herod kills John the Baptist Also in Mt 14:1-12 · Mk 6:14-29
- v10–17 96. Jesus feeds five thousand Also in Mt 14:13-21 · Mk 6:30-44
- v18–20 109. Peter says Jesus is the Messiah Also in Mt 16:13-20 · Mk 8:27-30
- v21–27 110. Jesus predicts his death the first time Also in Mt 16:21-28 · Mk 8:31-9:1
- v28–36 111. Jesus is transfigured on the mountain Also in Mt 17:1-13 · Mk 9:2-13
- v37–43 112. Jesus heals a demon-possessed boy Also in Mt 17:14-21 · Mk 9:14-29
- v44, 45 113. Jesus predicts his death the second time Also in Mt 17:22, 23 · Mk 9:30-32
- v46–48 115. The disciples argue about who would be the greatest Also in Mt 18:1-6 · Mk 9:33-37
- v49, 50 116. The disciples forbid another to use Jesus' name Also in Mk 9:38-41
- v51–62 122. Jesus teaches about the cost of following him Also in Mt 8:18-22
Indian Revised Version — Marathi (2019). Indian Revised Version (Marathi), Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0, via eBible.org. Inline cross-reference notes removed..