Indian Revised Version — Marathi (2019)
लूक 14
1एका शब्बाथ दिवशी तो परूश्यांच्या अधिकाऱ्यांपैकी एकाच्या घरी जेवावयास गेला, तेव्हा तेथे जमलेले लोक येशूवर बारकाईने नजर ठेवून होते. 2आणि तेथे त्याच्यासमोर जलोदर झालेला एक मनुष्य होता. 3येशूने नियमशास्त्र शिक्षकांना व परूश्यांना विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे नियमशास्त्राला धरुन आहे की नाही?” 4परंतु ते गप्पच राहिले. तेव्हा येशूने त्या आजारी मनुष्यास धरुन त्यास बरे केले व त्यास पाठवून दिले. 5मग तो त्यांना म्हणाला, “जर तुमच्यापैकी एखाद्याला एक मुलगा किंवा एक बैल आहे व तो विहीरीत पडला, तर शब्बाथ दिवशी तुम्ही त्यास ताबडतोब बाहेर काढणार नाही काय?” 6आणि या प्रश्नाला उत्तर देणे त्यांना जमले नाही. 7नंतर, आमंत्रित पाहुणे स्वतःसाठी मानाच्या जागा कसे निवडून घेत होते हे पाहून, त्याने त्यांना एक दाखला सांगितला, तो म्हणाला, 8“जेव्हा एखादा तुम्हास लग्नाच्या मेजवानीला आमंत्रित करील, तेव्हा मानाच्या आसनावर बसू नका कारण तुमच्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या मनुष्यास त्याने कदाचित आमंत्रण दिले असेल. 9मग ज्याने तुम्हा दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल आणि तुम्हास म्हणेल, या मनुष्यास तुझी जागा दे. मग अपमानित होऊन तुम्हास खालच्या जागी बसावे लागेल. 10पण जेव्हा तुम्हास आमंत्रित केलेले असेल, तेव्हा जा आणि अगदी खालच्या जागी जाऊन बसा. यासाठी की, जेव्हा यजमान येईल, तेव्हा तो तुम्हास म्हणेल, मित्रा, वरच्या आसनावर येऊन बस. तेव्हा तुझ्या पाहुण्यांसमोर तुझे गौरव होईल. 11कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.” 12मग ज्याने आमंत्रण दिले होते त्यास तो म्हणाला, “तू जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी भोजनास बोलावशील तेव्हा तुझ्या मित्रांना, भावांना, तुझ्या नातेवाईकांना किंवा श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नको, कारण तेही तुला परत आमंत्रण देतील व अशा रीतीने तुझ्या आमंत्रणाची परतफेड केली जाईल. 13पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे. 14म्हणजे तू धन्य होशील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नाही. तर नीतिमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.” 15मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने जेव्हा हे ऐकले, तेव्हा तो येशूला म्हणाला, “जो देवाच्या राज्यात भाकर खाईल, तो प्रत्येकजण धन्य.” 16मग येशू त्यास म्हणाला, “एक मनुष्य एका मोठ्या मेजवानीची तयारी करीत होता. त्याने पुष्कळ लोकांस आमंत्रण दिले. 17भोजनाच्या वेळी ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना ‘या कारण सर्व तयार आहे’ असा निरोप सांगण्यासाठी नोकराला पाठवले. 18ते सर्वजण सबब सांगू लागले. पाहिला त्यास म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे आणि मला जाऊन ते पाहिले पाहिजे. कृपाकरून मला क्षमा कर.’ 19दुसरा म्हणाला, ‘मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहोत व त्यांची पारख करण्यासाठी मी चाललो आहे, कृपाकरून मला क्षमा कर.’ 20आणखी तिसरा म्हणाला, ‘मी लग्न केले आहे व त्यामुळे मी येऊ शकणार नाही.’ 21तो नोकर परत आला व त्याने आपल्या मालकाला या गोष्टी सांगितल्या. मग घराचा मालक रागावला आणि नोकराला म्हणाला, ‘बाहेर रस्त्यावर आणि नगरातल्या गल्ल्यांमध्ये लवकर जा व गरीब, आंधळे, असहाय्य, लंगडे यांना घेऊन इकडे ये!’ 22नोकर म्हणाला, ‘मालक, आपल्या आज्ञेप्रमाणे केले आहे आणि तरीही आणखी जागा रिकाम्या आहे.’ 23मालक नोकराला म्हणाला, ‘रस्त्यावर जा, कुंपणाजवळ जा आणि तेथे असलेल्या लोकांस आग्रहाने आत येण्यास सांग म्हणजे माझे घर भरून जाईल. 24कारण मी तुम्हास सांगतो की, त्या आमंत्रित मनुष्यांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखायला मिळणार नाही.” 25मोठ्या संख्येने लोक येशूबरोबर चालत होते. तो त्यांच्याकडे वळाला व म्हणाला, 26“जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वतःच्या जीवाचासुद्धा द्वेष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही. 27जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येणार नाही, तो माझा शिष्य होऊ शकणार नाही. 28जर तुम्हापैकी कोणाला बुरुज बांधायचा असेल तर तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करून तो पूर्ण करावयास त्याच्याजवळ पुरेसे पैसे आहे की नाही हे पाहणार नाही काय? 29नाही तर कदाचित तो पाया घालील आणि पूर्ण करू शकणार नाही आणि जे पाहणारे आहेत ते त्याची थट्टा करतील आणि म्हणतील, 30या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली पण पूर्ण करू शकला नाही! 31किंवा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्यास निघाला, तर तो अगोदर बसून याचा विचार करणार नाही का? की, त्याच्या दहा हजार मनुष्यांनिशी त्याच्या शत्रूशी, जो वीस हजार सैन्यानिशी चालून येत आहे, त्यास त्याचा सामना करता येणे शक्य आहे काय? 32जर तो त्यास तोंड देऊ शकणार नसेल, तर त्याचा शत्रू दूर अंतरावर असतानाच तो मध्यस्थ पाठवून शांततेसाठी सलोख्याचे बोलणे सुरू करील. 33त्याच प्रकारे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्यास माझा शिष्य होता येणार नाही. 34मीठ चांगले आहे, पण मिठाची जर चव गेली, तर त्यास खारटपणा कशाने येईल? 35ते जमिनीच्या किंवा खताच्याही पूर्णपणे निरुपयोगी ठरेल व लोक ते फेकून देतील. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.”
This chapter is not in this version.
Keep going
In the life of Jesus 4 events in this chapter
- v1–6 155. Jesus heals a man with dropsy Only in लूक
- v7–14 156. Jesus teaches about seeking honor Only in लूक
- v15–24 157. Jesus tells the parable of the great feast Only in लूक
- v25–35 158. Jesus teaches about the cost of being a disciple Only in लूक
Indian Revised Version — Marathi (2019). Indian Revised Version (Marathi), Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0, via eBible.org. Inline cross-reference notes removed..