Skip to content

Indian Revised Version — Marathi (2019)

उत्पत्ति 17

1अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन दिले व त्यास म्हटले, “मी सर्वशक्तिमान देव आहे. माझ्या समक्षतेत चाल, आणि सात्त्विकतेने राहा. 2तू असे करशील, तर मी माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये एक करार करीन, आणि मी तुला अनेक पटींनी वाढवीन असे अभिवचन देतो.” 3मग अब्रामाने देवास लवून नमन केले आणि देव त्यास म्हणाला, 4“पाहा, तुझ्यासोबत माझा करार असा आहे: तू अनेक राष्ट्रांचा महान पिता होशील. 5येथून पुढे तुझे नाव अब्राम असणार नाही, तर तुझे नाव अब्राहाम असे होईल. कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता असे नेमले आहे. 6मी तुला भरपूर संतती देईन, आणि मी तुझ्यापासून नवीन राष्ट्रे उदयास आणीन, आणि तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील. 7मी तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये आणि तुझ्या वंशजांमध्येही पिढ्यानपिढ्या कायम लागू राहील असा सनातन करार करीन, तो असा की, मी तुझा आणि तुझ्यानंतर तुझ्या वंशजांचा देव होईन. 8ज्या प्रदेशामध्ये तू राहत आहेस तो, म्हणजे कनान देश, मी तुला व तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन, आणि मी तुमचा देव होईन.” 9नंतर देव अब्राहामाला पुढे म्हणाला, “आता या करारातील तुझा भाग हा असा, तू माझा करार पाळावा, तू आणि तुझ्या मागे तुझ्या वंशजांनी पिढ्यानपिढ्या पाळावयाचा माझा करार पाळावा. 10माझा करार जो, तू आणि तुझ्या मागे तुझ्या संतानाने पाळायचा तो हा की: तुमच्यातील प्रत्येक पुरुषांची सुंता व्हावी. 11माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये असलेला करार हा, तुम्ही आपली सुंता करून घ्यावी. 12पिढ्यानपिढ्या तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची त्याच्या जन्मानंतर आठ दिवसानी सुंता करावी. मग तो पुरुष तुझ्या कुटुंबात जन्मलेला असो किंवा तो तुझ्या वंशातला नसून परक्यापासून पैसा देऊन घेतलेला असो. 13अशा रीतीने तुझ्या राष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक पुरुषांची सुंता करावी, मग तो तुझ्या कुटुंबातील असो किंवा विकत घेतलेल्या गुलामाच्या कुटुंबात जन्मलेला असो; तुझ्या व माझ्यामध्ये केलेला करार या खुणेवरून कायम राहील. 14ज्या कोणाची सुंता झाली नाही अशा पुरुषाला त्याच्या लोकांतून बाहेर टाकावे; कारण त्याने माझा करार मोडला आहे.” 15देव अब्राहामाला म्हणाला, “तुझी पत्नी साराय, हिला येथून पुढे साराय असे संबोधू नको. त्या ऐवजी तिचे नाव सारा असे होईल. 16मी तिला आशीर्वादित करीन, आणि मी तुला तिच्यापासून मुलगा देईन. मी तिला आशीर्वादीत करीन, आणि ती अनेक राष्ट्रांची माता होईल. लोकांचे राजे तिच्यापासून निपजतील.” 17अब्राहामाने देवाला लवून नमन केले आणि तो हसला, तो मनात म्हणाला, “शंभर वर्षांच्या मनुष्यास मुलगा होणे शक्य आहे का? आणि सारा, जी नव्वद वर्षांची आहे, तिला मुलगा होऊ शकेल का?” 18अब्राहाम देवाला म्हणाला, “इश्माएल तुझ्या समोर जगावा तेवढे पुरे!” 19देव म्हणाला, “नाही! परंतु तुझी पत्नी सारा हिलाच मुलगा होईल, आणि त्याचे नाव तू इसहाक असे ठेव. मी त्याच्याशी निरंतरचा करार करीन; तो करार त्याच्यानंतर त्याच्या वंशजांसोबत निरंतर असेल. 20तू मला इश्माएलविषयी विचारलेस ते मी ऐकले आहे. पाहा, मी आतापासून पुढे त्यास आशीर्वाद देईन, आणि त्यास फलद्रुप करीन आणि त्यास बहुगुणित करीन. तो बारा सरदारांच्या वंशांचा पिता होईल, आणि मी त्यास एक मोठे राष्ट्र करीन. 21परंतु मी इसहाकाबरोबर माझा करार स्थापीन, ज्याला सारा पुढल्या वर्षी याच वेळी जन्म देईल.” 22देवाने त्याच्याशी बोलणे संपवल्यावर, देव अब्राहामापासून वर गेला. 23त्यानंतर अब्राहामाने त्याचा मुलगा इश्माएल आणि त्याच्या घराण्यात जन्मलेले आणि जे सर्व मोल देऊन विकत घेतलेले अशा सगळ्या पुरुषांना एकत्र केले, आणि देवाने सांगितल्याप्रमाणेच त्याच्या घरातील सर्व पुरुषांची त्या एकाच दिवशी सुंता केली. 24अब्राहाम नव्याण्णव वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली. 25आणि त्याचा मुलगा इश्माएल तेरा वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली. 26अब्राहाम आणि त्याचा मुलगा इश्माएल या दोघांची एकाच दिवशी सुंता झाली. 27त्याच्या घरी जन्मलेले व त्याने विकत घेतलेले असे त्याच्या घरचे सगळे पुरुष यांचीही त्याच्या बरोबर सुंता झाली.

Keep going

Indian Revised Version — Marathi (2019). Indian Revised Version (Marathi), Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0, via eBible.org. Inline cross-reference notes removed..

Books

✦ Explain this verse with AI AI explanations, Bible Q&A, characters, maps and more — in the Truth of Bible app →

Reading settings

Theme
Text size
100%
Layout

Loading the Bibles…

Your choice is remembered on this device and used for reading, search and the verse screen.