Skip to content

Indian Revised Version — Marathi (2019)

2 शमुवेल 6

1दावीदाने पुन्हा इस्राएलातून निवडक तीस हजार माणसे निवडून सैन्य तयार केले. 2आणि दावीद आपल्याजवळ असलेल्या सर्व लोकांसोबत यहूदातील बाला येथे गेला, आणि तेथून देवाचा कोश, ज्यावर ते नाव, म्हणजे करुबांच्या वरती राजासनी बसणारा जो सैन्यांचा परमेश्वर त्याचे नाव लिहिले आहे तो देवाचा कोश वर आणायला चालला. 3अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून दावीदाच्या लोकांनी हा देवाचा कोश आणला. मग तो एका नव्या गाडीवर ठेवला. अबीनादाबचे पुत्र उज्जा आणि अह्यो हे ती गाडी हाकीत होते. 4अबीनादाबाच्या डोंगरावरील घरातून हा देवाचा कोश त्यांनी वाहून आणला. अह्यो देवाच्या कोशापुढे चालू लागला. 5तेव्हा देवदारूच्या लाकडापासून केलेली नानाविध वाद्ये आणि वीणा, सारंगी, डफ, डमरु, झांजा वाजवत दावीद आणि त्याच्या बरोबरचे सर्व इस्राएल लोक नाचत परमेश्वरापुढे चालू लागले. 6ते सर्व नाखोनच्या खळ्यापाशी आले तेव्हा बैल अडखळल्याने देवाचा कोश गाडीतून पडायला लागला. तेव्हा उज्जाने तो सावरला. 7पण परमेश्वराचा कोप त्याच्यावर होऊन उज्जाला मरण आले. देवाच्या कोशाला स्पर्श करून त्याने देवाविषयी अनादर दाखवला. तेव्हा कराराच्या कोशा शेजारीच उज्जा गतप्राण झाला. 8परमेश्वरने उज्जाला ताडना दिली यामुळे दावीद फार दु:खी झाला आणि त्याने या जागेचे नाव पेरेस-उज्जा म्हणजे, उज्जाला शासन, असे ठेवले. आजही ते नाव प्रचलित आहे. 9मात्र दावीदाला त्या दिवशी परमेश्वराचा धाक वाटू लागला तो मनात म्हणाला, “आता मी हा पवित्र कोश माझ्याकडे कसा आणू?” 10परमेश्वराचा पवित्र कोश (पवित्र कोशाची पेटी) आपल्याबरोबर दावीद नगरात आणण्याची दावीदाची इच्छा नव्हती, त्या ऐवजी, त्याने तो कोश (दावीदानगरात न हलवता) एका बाजूस नेऊन ओबेद-अदोम गित्ती याच्या घरी ठेवला. 11तिथे परमेश्वराचा कोश तीन महिने होता. ओबेद-अदोमाच्या कुटुंबाला देवाने आशीर्वाद दिला. 12पुढे लोक दावीदाला म्हणाले, “ओबेद-अदोमाच्या कुटुंबाला आणि त्याच्या सर्व मालमत्तेला परमेश्वराचा आशीर्वाद आहे.” कारण देवाचा कोश तेथेच आहे. तेव्हा दावीदाने तो पवित्र कोश त्याच्या घरातून आपल्याकडे आणला. यावेळी दावीदाचा आनंद गगनात मावत नव्हता. 13परमेश्वराचा कोश वाहून नेणारे लोक सहा पावले चालून गेल्यावर दावीदाने एक बैल आणि एक धष्टपुष्ट गोऱ्हा यांचे अर्पण केले. 14सुती एफोद घालून दावीद परमेश्वरापुढे नृत्य करत होता. 15दावीद आणि सर्व इस्राएल लोक आनंदाने बेभान झाले होते. नगरात परमेश्वराचा कोश आणताना ते जयजयकार करत होते. शिंग वाजवत होते. 16शौलाची कन्या मीखल हे सर्व खिडकीतून पाहत होती. परमेश्वराचा कोश नगरात आणत असताना दावीद त्याच्यापुढे नाचत उड्या मारत होता. मीखलने हे पाहिले तेव्हा तिला त्याचा विट वाटला. दावीद स्वतःचे हसे करून घेत आहे असे तिला वाटले. 17या कराराच्या कोशासाठी दावीदाने राहुटी उभारली होती. त्यामध्ये योग्य जागी इस्राएली लोकांनी तो ठेवला. मग दावीदाने परमेश्वरा पुढे होमार्पणे आणि शांत्यर्पणे वाहिली. 18होमार्पणे व शांत्यर्पणे केल्यावर दावीदाने सर्वांना सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाने आशीर्वाद दिले. 19शिवाय इस्राएलाच्या प्रत्येक स्त्री पुरूषास त्याने भाकरीचा तुकडा, खिसमिसाच्या ढेपेचा तुकडा आणि खजूर मिश्रित भाकरीचा तुकडा दिला. मग सर्वजण आपापल्या घरी गेले. 20मग दावीद घरातील सर्वांना आशीर्वाद द्यायला घरात आला. तेव्हा शौलकन्या मीखल हिने त्यास गाठले आणि ती म्हणाली, “इस्राएलाच्या राजाने आज आपला सन्मान राखला नाही. नोकरा-चाकरांसमोर, दासीसमोर त्या मूर्खांपैकीच एक असल्याप्रमाणे तुम्ही आपले वस्त्र काढलेत!” 21तेव्हा दावीद तिला म्हणाला, “तुझे वडील किंवा तुझ्या घराण्यातील दुसरे कोणी या सर्वांना सोडून परमेश्वराने मला निवडले आहे. सर्व इस्राएलांचा मी नेता आहे. तेव्हा मी परमेश्वरापुढे असाच नाचतगात जाणार. 22मी याच्याही पुढची पायरी गाठीन. तुला आदर नसेल कदाचित् पण ज्या दासींचा तू उल्लेख केलास त्यांना माझ्याबद्दल आभिमान वाटतो.” 23शौलाची कन्या मीखल हिला मूलबाळ झाले नाही. ती तशीच विनापत्य वारली.

Keep going

Indian Revised Version — Marathi (2019). Indian Revised Version (Marathi), Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0, via eBible.org. Inline cross-reference notes removed..

Books

✦ Explain this verse with AI AI explanations, Bible Q&A, characters, maps and more — in the Truth of Bible app →

Reading settings

Theme
Text size
100%
Layout

Loading the Bibles…

Your choice is remembered on this device and used for reading, search and the verse screen.