Skip to content

Indian Revised Version — Marathi (2019)

2 शमुवेल 11

1वसंत ऋतूमध्ये ज्यावेळी राजे युध्द मोहिमांवर जातात त्यावेळी दावीदाने यवाबाला सर्व नोकरा चाकरांचा लवाजमा आणि समस्त इस्राएलांना अम्मोन्यांच्या संहारासाठी पाठवले. यवाबाच्या सैन्याने अम्मोन्यांच्या राब्बा या राजधानीच्या शहराला वेढा घातला दावीद मात्र यरूशलेम येथेच राहिला. 2संध्याकाळी तो आपल्या पलगांवरून उठला, आणि राजमहालाच्या छतावरून फिरु लागला. तिथून त्यास एक स्त्री स्नान करताना दिसली. ती अतिशय रुपवान होती. 3तेव्हा दावीदाने आपल्या सेवकवर्गाला बोलवून तिची माहिती काढली सेवकाने सांगितले ती अलीयमची मुलगी बथशेबा, उरीया हित्ती याची पत्नी आहे. 4तिला आपल्याकडे घेऊन यायला दावीदाने निरोप्याला पाठवले. ती आल्यावर दावीदाने तिच्याशी शरीरसंबंध केला, नंतर स्नान करून शुध्द होऊन ती पुन्हा आपल्या घरी परतली. 5पण बथशेबा गर्भवती राहिली दावीदाला तिने निरोप पाठवला तिने सांगितले, मी गरोदर आहे. 6दावीदाने यवाबाला निरोप पाठवला की, उरीया हित्तीला माझ्याकडे पाठवा. तेव्हा यवाबाने उरीया हित्तीला दावीदाकडे पाठवले. 7उरीया आल्यावर दावीद त्याच्याशी बोलला. उरीयाला त्याने यवाब, सर्व सैन्य, लढाई यांचे वर्तमान विचारले. 8मग दावीद उरीयाला म्हणाला, घरी जा आणि आराम कर उरीया महालातून बाहेर पडला त्यानंतर त्याच्यासाठी राजातर्फे भेट पाठवण्यात आली. 9पण उरीया घरी गेला नाही. तो महालाच्या बाहेरच दाराशी झोपून राहिला. राजाच्या सेवक वर्गाप्रमाणेच तो तिथे झोपला. 10उरीया घरी परतला नसल्याचे सेवकांनी दावीदाला सांगितले. तेव्हा दावीद उरीयाला म्हणाला, तू लांबून प्रवास करून आला आहेस, तर तू घरी का गेला नाहीस? 11उरीया दावीदाला म्हणाला, पवित्र कराराचा कोश, इस्राएलचे सैनिक, आणि यहूदा हे राहुट्यांमध्ये राहत आहेत. माझा धनी यवाब आणि महाराजांचे (दावीदाचे) सेवक ही खुल्या मैदानात तळ देऊन आहेत. अशावेळी मीच तेवढे घरी जाऊन खाणेपिणे करणे आणि पत्नीच्या सहवासात झोपणे योग्य होणार नाही. 12दावीद उरीयाला म्हणाला, आजच्या दिवस इथे राहा उद्या मी तुला युध्दभूमीवर पाठवतो. उरीयाने त्या दिवशी यरूशलेमेमध्येच मुक्काम केला. 13दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने त्यास भेटायला बोलावले. दावीदाबरोबर उरीयाने भोजन केले. दावीदाने त्यास बेहोश होईपर्यंत मद्य पाजले पण तरी उरीया घरी गेला नाही. त्या संध्याकाळीसुद्धा तो राजाच्या सेवकांबरोबरच महालाच्या दाराशी झोपायला गेला. 14दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने यवाबासाठी एक पत्र लिहून ते उरीयाला न्यायला सांगितले. 15त्या पत्रात दावीदाने लिहिले होते, आघाडीवर जेथे तुंबळ युध्द चालले असेल, तेथे उरीयाला पाठवा. त्यास एकट्याला तेथे सोडा, म्हणजे तो युध्दात कामी येईल. 16यवाबाने नगराची टेहेळणी करून सर्वात लढवय्ये अम्मोनी कोठे आहेत ते पाहिले, आणि उरीयाला तेथे नेमले. 17राब्बा नगरातील लोक यवाब विरूद्ध चालून आले. दावीदाची काही माणसे मारली गेली उरीया हित्ती हा त्यापैकी एक होता. 18नंतर यवाबाने युध्दातील हकिकतीचे सविस्तरवृत्त संदेशवाहकाद्वारे दावीदाला पाठवले. 19युध्दात जे जे झाले ते सर्व सांगायला त्याने आपल्या नोकराला सांगितले. 20यवाब सेवकाला म्हणाला, कदाचित राजा संतापून म्हणेल यवाबाचे सैन्य नगराच्या इतके जवळ भिडले कसे? शत्रू तटाच्या भिंतीवरून शिरसंधान करतील हे त्यास ठाऊक असायला हवे. 21तेबेसमध्ये यरुब्बेशेथाचा पुत्र अबीमलेख याला एका स्त्रीने मारले हे आठवते ना? तिने तटबंदीवरून जात्याची तळी उचलून अबीमलेखवर टाकली. असे असताना हा इतक्या जवळ का गेला? राजा दावीद असे काही म्हणाला, तर त्यास हे ही म्हणावे की, उरीया हित्ती हा तुमचा सेवकही यामध्ये मारला गेला. 22निरोप्याने दावीदाकडे जाऊन यवाबाने जे जे सांगायला सांगितले ते सर्व कथन केले. 23तो म्हणाला, अम्मोन्यांनी आमच्यावर मैदानात हल्ला केला आम्ही त्यांचा सामना करून त्यांना नगराच्या वेशीपर्यंत पळवून लावले. 24मग तटबंदीवरील काही लोकांनी आपल्या शिपायांवर बाणांचा वर्षाव केला त्यामध्ये काही जण ठार झाले उरीया हित्ती हा तुमचा सेवकही प्राणाला मुकला. 25दावीद त्या निरोप्याला म्हणाला, यवाबाला सांग निराश होऊ नको. हिम्मत सोडू नको. तलवारीने कोणाचाही संहार होऊ शकतो. राब्बावर आणखी जोरदार हल्ला चढवा, तुम्ही जिंकाल. यवाबाला माझा हा निरोप सांगून प्रोत्साहन दे. 26उरीया मरण पावल्याचे बथशेबाला कळले तिने पतिनिधनाबद्दल शोक केला. 27काही काळाने तिचे दुःख ओसरल्यावर दावीदाने सेवकाकरवी तिला आपल्याकडे आणले. ती त्याची पत्नी झाली आणि त्याच्या पुत्राला तिने जन्म दिला. पण दावीदाचे हे नीच कृत्य परमेश्वरास पसंत पडले नाही.

Keep going

Indian Revised Version — Marathi (2019). Indian Revised Version (Marathi), Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0, via eBible.org. Inline cross-reference notes removed..

Books

✦ Explain this verse with AI AI explanations, Bible Q&A, characters, maps and more — in the Truth of Bible app →

Reading settings

Theme
Text size
100%
Layout

Loading the Bibles…

Your choice is remembered on this device and used for reading, search and the verse screen.